एसटीच्या प्रवासात आतापर्यंत बनलेल्या मैत्री
प्रवास हा केवळ एक जाग्याहून दुसऱ्या जागी जाण्याची गोष्ट नसते, तर त्यात नवे अनुभव, नवे लोक आणि कधी कधी नवी नाती देखील निर्माण होतात. आपल्या एसटीची बस सेवा हे केवळ प्रवासाचे साधन नसून, लोकांना जोडणारा एक अतूट दुवा आहे.
एसटीच्या प्रवासात आपण अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो – काही प्रवासी असतात ज्यांच्यासोबत आपण फक्त काही मिनिटे घालवतो, तर काही जण आपले कायमचे मित्र होऊन जातात.
माझ्या एसटी प्रवासाच्या अनुभवात असे अनेक प्रसंग आले, जेथे नवे मित्र मिळाले आणि काही अविस्मरणीय आठवणी तयार झाल्या. चला, अशाच काही आठवणींचा थोडक्यात प्रवास करूया.
१. पहिली ओळख – बसमधील सहप्रवासी ते मित्र-
एकदा मी वाड्याहून मालेगावला जाण्यासाठी एसटीने प्रवास करत होतो. बस नाशिक ठक्कर बाजार बसस्थानकातून निघाली आणि माझ्या शेजारी एक तरुण बसला. प्रवास सुरू झाल्यावर थोड्या वेळाने आम्ही एकमेकांना सहज ओळख विचारली. तो नाशिकचा होता आणि मालेगावला नातेवाईकांकडे चालला होता. गप्पा रंगू लागल्या आणि आमच्या आवडी-निवडी जुळू लागल्या.
त्याचा आणि माझा प्रवासाचा छंद एकच असल्याचे समजले, त्यामुळे आमच्या गप्पांचा विषयही ठरला! आम्ही एसटीच्या जुन्या आठवणी, महाराष्ट्रभरच्या विविध एसटी मार्गांबद्दल चर्चा केली. प्रवास कधी संपला कळलंच नाही. मालेगावला उतरल्यावर त्याने मला त्याच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला बोलावले आणि तिथून आमची चांगली मैत्री झाली.
२. 'आवडेल तिथे प्रवास' आणि प्रवासवेडे मित्र-
माझा 'आवडेल तिथे प्रवास' पासचा अनुभव खास आहे. जानेवारी २०२५ मध्ये मी हा पास घेतला आणि चार दिवस नागपूर शहर भटकण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात मला अनेक नव्या मित्रांची ओळख झाली.
दुपारी वाड्यातूनहून निघाल्यानंतर माझा विदर्भ दौऱ्याचा प्रवास भिवंडी वरून सुरू झाला. तिथे एका सहप्रवाशाशी ओळख झाली जो माझ्यासारखाच प्रवासाचा शौकीन होता, जो मुंबईहून खास कळमनुरीला फिरायला चालला होता. बसमध्ये जागा पकडून आम्ही रात्रीच्या गप्पांमध्ये 'एसटीच्या सर्वोत्तम बस रूट्स' आणि प्रवासातील अनुभव शेअर करत राहिलो. असे प्रवासवेडे लोक भेटले की, प्रवास अजूनच आनंददायक झाला,
दुसऱ्या दिवशी सकाळी तो कळमनुरीला उतरला आणि मी नागपूरला पोहोचलो.
३. गावाकडची माणसं आणि माणुसकीचा गोडवा-
एकदा मी रत्नागिरी ते भिवंडीपर्यंत प्रवास करत असताना बसमध्ये एक वयोवृद्ध आजोबा बसले होते. त्यांना बसमध्ये चढायला त्रास होत होता, म्हणून मी त्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान खूप काही सांगून गेले.
ते आजोबा तिथलेच रहिवासी होते, प्रवासादरम्यान त्यांनी मला कोकणातील जुन्या आठवणी सांगायला सुरुवात केली. ते पूर्वी शिक्षक होते आणि अनेक विद्यार्थ्यांना शिकवले होते. प्रवास संपल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गावात येण्याचं निमंत्रण दिलं. प्रवासात कधी कधी अशी सुंदर माणसं भेटतात, ज्यांच्याशी नकळत एक अनोखं नातं तयार होतं.
४. एसटी प्रवासातील विद्यार्थी मित्र-
जव्हारला प्रवास करत असताना माझी ओळख एका कॉलेजच्या विद्यार्थ्याशी झाली. तो रोज विक्रमगडहून जव्हारला शिकायला जात होता. तो म्हणाला, "एसटी नसती तर माझं शिक्षण पूर्ण झालं नसतं!" त्याचं हे वाक्य ऐकून एसटीचं खरे महत्त्व कळलं.
त्याच्याशी चर्चा करताना कळलं की त्याने एसटीत अनेक मित्र जोडले होते, कारण रोज त्याच त्या प्रवाशांबरोबर,चालक-वाहकांबरोबर प्रवास करताना त्यांच्यात एक अनोखी मैत्री झाली होती.
५. रात्रीच्या प्रवासातील अविस्मरणीय गप्पा-
रात्रीच्या एसटी प्रवासात एक वेगळीच मजा असते. एकदा नागपूरहून नाशिकला येणाऱ्या शिवशाही बसमध्ये एक प्रवासी माझ्या शेजारी बसला. तोही माझ्यासारखाच प्रवासवेडा होता. आम्ही रात्रीच्या प्रवासात चंद्रप्रकाशात रस्त्यावरून धावणाऱ्या एसटीच्या आठवणी शेअर करत राहिलो.
तो म्हणाला, "रात्रीची एसटी म्हणजे दुसऱ्या दुनियेतील प्रवासासारखं वाटतं!" खरंच, रात्रीच्या वेळी गडद आकाशाखाली एसटीचा प्रवास हा वेगळ्याच स्वप्नासारखा वाटतो. त्यादिवशी झालेल्या गप्पा आजही लक्षात राहिल्या आहेत.अजूनही आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. काहीही म्हणा पण विदर्भाची माणसं खूप चांगली आहेत.
६. एकत्र प्रवास, एकत्र अनुभव-
एसटीच्या प्रवासात कधीही एकटेपणा वाटत नाही. कुणी ना कुणीतरी बोलायला, मदतीला, सोबत हसण्यासाठी आणि अनुभव शेअर करण्यासाठी भेटतं. प्रवास संपतो, पण त्या आठवणी कायम मनात राहतात. एसटीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वयोगटातील लोक भेटतात – विद्यार्थी, नोकरदार, पर्यटक, गावकरी आणि कधी कधी अशा व्यक्ती ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. काही तर प्रवासापुरतेच असतात, काही कायमचे बनतात. पण एक गोष्ट नक्की,“एसटीचा प्रवास हा केवळ अंतर पार करण्याचा प्रवास नसून, तो नवनव्या माणसांशी जोडण्याचा एक सुंदर प्रवास आहे.”
एसटीमध्ये होणाऱ्या या छोट्या-छोट्या भेटी आयुष्यभर लक्षात राहतात. प्रवासात होणाऱ्या या नव्या ओळखी, त्यांच्यासोबत वाटून घेतलेल्या गप्पा आणि अनुभव हेच एसटी प्रवासाचं खरे सौंदर्य आहे.
तुम्हालाही एसटीच्या प्रवासात काही खास मित्र मिळाले आहेत का? तुमच्या अशा आठवणी असल्यास मला नक्की कळवा!

Comments
Post a Comment