वाडा आगारासाठी ऐतिहासिक दिवस – एकाचवेळी 5 नवीन बसेस दाखल
ज्याची केवळ वाट पाहत होतो, तो दिवस अखेर उजाडला!"
दि.२९/०६/२०२५,
वाडा आगाराच्या इतिहासामध्ये एक सुवर्णपान लिहिलं गेलं – कारण पहिल्यांदाच, एकाचवेळी तब्बल ५ नवीन बसेस आगारात दाखल झाल्या! हा क्षण केवळ बसच्या आगमनाचं नव्हतं, तर तो होता स्वप्नांच्या पूर्णत्वाचा, मेहनतीच्या सन्मानाचा आणि विकासाच्या नव्या वाटेचा आरंभ!
त्या दिवशी सकाळपासूनच वाडा डेपोच्या वातावरणात एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती. सर्व कर्मचाऱ्यांच्या नजरा रस्त्याकडे लागलेल्या होत्या. कुणाच्या हातात माला,फुगे आणि माझ्या हातात कॅमेरा आणि सगळ्यांच्या डोळ्यांत – अगदी मुलासारखी उत्सुकता आणि आनंद!
बघता बघता, लाल रंगाच्या त्या सुंदर नव्या बसेस डेपोच्या पार्किंग यार्डमधून वळल्या आणि वॉश होऊन रांगेत उभ्या राहिल्या… आणि सर्वत्र जल्लोष झाला. "आपल्या लालपरी आल्या!" असं म्हणत सर्वांनी टाळ्यांचा, माळांचा, सेल्फीचा वर्षाव केला.
या ऐतिहासिक घटनेला खासदार डॉ. हेमंत सवरा साहेब आणि आमदार श्री. शांताराम मोरे साहेब यांच्या हस्ते औपचारिक लोकार्पण करण्यात आलं. त्यांच्या उपस्थितीने आगारात एक वेगळीच ऊर्जा पसरली.
“विकासासाठी वाहतूक महत्त्वाची आहे. वाड्याचा विकास ST शिवाय पूर्ण होऊ शकत नाही,” असं खासदार साहेबांनी भाषणात सांगितलं आणि उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची छाया उमटली.
या बसच्या आगमनामागे माझ्या आयुष्यातील एक भावनिक क्षण दडलेला आहे. त्यादिवशी मी स्वतः नव्या बसचं स्टेअरिंग हातात घेऊन,डेपोत बसने राउंड मारला.
ती बस चालवताना खूप बरं वाटलं. आजची भावना वेगळीच होती – ही केवळ बस नाही, ती आहे विकासाची ग्वाही, आपल्या मेहनतीचं फलित आणि वाडा आगारच्या पुढच्या पायरीचा आरंभ!
कित्येक वर्षं जुन्या बसेस सांभाळताना आलेल्या अडचणी, प्रवाशांचे तक्रारी, रस्त्यावरील थांबा – यावर ही नव्या बसेस उत्तर ठरल्या.
या नव्या बसेस केवळ आगारातच नाही, तर वाडा शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात उमेद घेऊन पोहोचणार आहेत. आता या बसेस वाडा शहराला जळगाव, शिर्डी, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांशी अधिक सुबकपणे जोडतील.
त्या दिवसाची प्रवाशांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी होती – "आता प्रवास अधिक आरामदायक, वेळेवर आणि सुरक्षित होणार आहे."
हा दिवस विसरणं अशक्य आहे. एकाचवेळी पाच नवीन बसेस, त्यांचं लोकार्पण, स्वतः त्यातील एक बस चालवण्याचा मान, आणि आगारातील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतली चमक – हे सगळं अनुभवणं म्हणजे एका स्वप्नाचं साकार होणं होतं.
हा केवळ एक दिवस नव्हता, तर तो होता –
"विकासाच्या दिशेने टाकलेला एक ठाम पाऊल!"




Comments
Post a Comment