एसटीचे जुने तिकीट आणि काही आठवणी
बालपणीच्या आठवणींमध्ये अनेक गोष्टी खास जागा घेतात—शाळेचा पहिला दिवस, लहानपणी खेळलेली खेळणी, आणि अर्थातच, एसटी प्रवास! एसटी म्हणजे फक्त एक प्रवासी वाहन नव्हे, तर तो एक अनुभव आहे. गावाकडच्या मळ्यामधून धावणारी लाल एसटी, तिचा तो खास हॉर्न, आणि प्रवासादरम्यान मिळणारे छोटेसे तिकीट—या सगळ्याच गोष्टी मनात कायम घर करून राहतात.
आता डिजिटल युग आलं, तिकीट मशिनद्वारे निघायला लागली, पण एकेकाळी हातात मिळणाऱ्या त्या छोट्या तिकिटांची मजाच वेगळी होती. त्यावर मध्यभागी एसटीचा लोगो असायचा आणि त्याखाली लालशार नंबर असलेलं तिकीट, तो तिकीट हातात घेताना जी मजा यायची, ती आजच्या प्रिंटेड तिकीटांमध्ये नाही.
तेव्हा एसटीत बसल्यानंतर तिकीट काढण्याचा एक वेगळाच थरार असायचा. वाहक (कंडक्टर) हातात एक मॅकेनिकल तिकिटांची पेटी घेऊन यायचे आणि त्याच्या त्या पेटीमधून तिकीट काढतानाचा तो 'कट-कट' आवाज अजूनही कानात घुमतो. कधी कधी तिकीटाची किंमत २ रुपये, ५ रुपये किंवा फार तर १० रुपये असायची. काही जण ते तिकीट व्यवस्थित दुमडून खिशात ठेवायचे, काही त्यावर बसल्या जागीच आकडे टाकायचे, तर काही जण प्रवास संपल्यावर ते आठवण म्हणून जपून ठेवायचे. मलाही छंद आहे जुने तिकिटे सांभाळून त्यांचा संग्रह करायचा..!
माझ्या लहानपणीचा एक आठवणीतला एसटी प्रवास अजूनही ताजा आहे. शाळेच्या उन्हाळी सुट्टीत आजोळी जायचं म्हटल्यावर आमच्या घरच्यांचा गावी जाण्याचा पहिला पर्याय एसटीच असायचा. सकाळी लवकर बसस्थानकावर पोहोचायचं आणि मोठ्या लाल-पिवळ्या एसटीत बसायचं. "दोन फुल, दोन हाफ" असं ऐकताना खूप भारी वाटायचं.वय कमी दाखवण्यासाठी आई मला खाली सरकायला सांगायची. त्या वेळी ५ रुपयात साधा तिकीट मिळायचं आणि ५० पैशात बालतिकीट असं काहीतरी something !
बस सुरू झाल्यावर खिडकीतून बाहेर बघताना वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर जाणवायची. शेत, डोंगर, नद्या, आणि मधूनच एखादं खोपटं दिसायचं. रस्त्याच्या बाजूने लागणारी झाडं, पावसाळ्यात लाल मातीने माखलेले रस्ते, आणि एसटीचा तो इंजिनचा खास वास—या सगळ्या गोष्टी मनात घर करून बसलेल्या आहेत.
त्या काळात सुद्धा मला एसटीची तिकीटं गोळा करायची सवय होती. प्रवास झाल्यावर मी तिकीट टाकायचो नाही, उलट व्यवस्थित जपून ठेवायचो. वेगवेगळ्या मार्गांची, रंगसंगतीतील आणि ठाणे, पुणे, नाशिक, जव्हार, अहमदनगर अशा ठिकाणांची तिकीटं माझ्याकडे साठलेली होती. माझ्या वहित मी त्या तिकिटांची वेगळी पाकीटं बनवलेली. त्यात काही तिकीटं फाटकी, काही दुमडलेली, पण प्रत्येक तिकिटासोबत आठवणी मात्र ठळक!
आज एसटीच्या नव्या डिजिटलीकरणाच्या युगात जुन्या तिकिटांचा सुवास हरवला असला तरी आठवणी मात्र कायम आहेत. अजूनही कधी तरी जुन्या वस्तू शोधताना त्या तिकिटांचा गठ्ठा दिसतो आणि पुन्हा एकदा त्या प्रवासात हरवून जायचं मन होतं.
त्या काळच्या तिकिटामध्ये कितीतरी मोठ्या आठवणी दडलेल्या आहेत, नाही का?
तुम्हीही लहानपणी एसटी प्रवासात घेतलेल्या त्या तिकिटांची आठवण कधी काढली आहे का? तुम्हीही तिकीट गोळा करत होतात का?
तुमच्या आठवणी ऐकायला आवडेल!

Comments
Post a Comment