प्रवास आणि त्यात अनुभवलेले काही क्षण
प्रवास.., प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हे, तर स्वतःला शोधण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. प्रत्येक प्रवास एक नवं शिकवण देतो, एक नवी ऊर्जा भरतो. या प्रवासात हॉटेल, बसथांबा, आणि निसर्ग यांचा हातभार लागतो.
माझ्या प्रवासाला सुरुवात झाली वाड्याच्या बसस्थानकावर. सकाळची वेळ होती; बसस्थानक प्रवाशांनी भरून गेला होता. एसटीची वाट पाहताना आजूबाजूच्या गोंधळात एक वेगळी ऊर्जा जाणवत होती. प्रवाशांच्या चेहऱ्यावर आशा, उत्सुकता आणि थोडी घाईही दिसत होती. मग मी त्या वातावरणाचा भाग झालो आणि माझा प्रवास सुरू झाला.
त्यादिवशी बसस्थानकावर मला जाणवलं की आयुष्यदेखील अशा प्रवासासारखंच आहे – गडबड, थांबे आणि पुढे जाण्याचा दृढ संकल्प. प्रवासातुन घेतलेला पहिला धडा – गंतव्य ठिकाण कितीही दूर असलं तरी प्रवास सुरू करायला हवाच.
वाड्याहून निघाल्यावर पहिला १५ मिनिटांचा थांबा खोडाळा गावातील एका छोट्या हॉटेलवर झाला. प्रवासाने थोडी दमणूक झालेली, पण या हॉटेलच्या गरम चहा आणि वडापावने ताजेतवाने वाटले. हॉटेलमध्ये भेटलेल्या इतर प्रवाशांशी बोलताना त्यांच्या अनुभवांनी माझं मन भारावून गेलं.
खोडाळा गावचा स्थानिक वडा-पावचा आनंद घेताना जाणवलं की प्रवासात केवळ गंतव्यस्थानी पोहोचणं महत्त्वाचं नसतं, तर वाटेत घेतलेले हे छोटे आनंदाचे क्षणही तितकेच महत्त्वाचे असतात. "प्रवासातील विश्रांती आपल्याला पुढील पायऱ्यासाठी तयार करत असते," हे मी अनुभवलं.
नाशिक जिल्ह्याची हद्द लागली, बसमधून पुढे जाताना हरिहरगड-त्र्यंबकेश्वरचा हिरवागार परिसर मागे पडत होता, आणि डोंगर-दऱ्या, लांबच लांब शेतं माझ्या नजरेत साठवत होत्या. या प्रवासात मला कधी बाहेरचा निसर्ग पाहून आनंद झाला, तर कधी स्वतःच्या विचारांत हरवायला वेळ मिळाला.
प्रवासाच्या प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसत होतं – गावातील जीवन, स्थानिकांची कामं, आणि त्यांच्या साध्या जीवनातील आनंद. औरंगाबादच्या दिशेने जाताना मनात विचार आला की, "प्रवास आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांसारखा असतो – थोडा खडतर, थोडा सुंदर, पण कायम पुढे जाणारा."
बस त्र्यंबकेश्वर, नाशिक,निफाड, येवला, छ. संभाजीनगर जिल्ह्यातला वैजापूर तालुका असे असे बसस्थानकला भेट देत, आमची बस शेवटच्या बसथांब्यावर पोहोचली.
अखेर बसने मला छत्रपती संभाजीनगरच्या जवळ (बाबा पेट्रोल पंप) नेलं. गाडीतील प्रवाशांशी संवाद साधताना मी इतकं काही शिकलो की वाटलं, हा प्रवास केवळ मैलांचा नव्हे तर अनुभवांचा होता. छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक ठिकाणांची झलक मनात रंगवली आणि
जाणवलं की प्रत्येक प्रवास नवीन कथा सांगतो.
वाड्याहून छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) जाताना मिळालेले अनुभव आयुष्यभर सोबत राहणार आहेत. बसथांब्यावरील गोंधळाने मला शिकवलं की ध्येयासाठी तयारी महत्त्वाची आहे. हॉटेलने दिलेला आराम मला पुढे जाण्याची ऊर्जा देऊन गेला. आणि प्रवासाच्या वाटेने मला समजावलं की, "जीवनात गंतव्य ठिकाणाला पोहोचणं महत्त्वाचं आहे, पण त्या प्रवासातील क्षणही तितकेच अनमोल आहेत."
तुम्हालाही असा प्रवास करायची संधी मिळाली तर ती हातातून जाऊ देऊ नका. कारण प्रवास तुम्हाला नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करतो.
प्रवास करा, शिकत रहा, आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या!

Comments
Post a Comment