प्रवास, वाडा ते त्र्यंबकेश्वर पर्यंतचा
प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नाही, तर तो अनुभव, आठवणी, आणि संधींचा संगम आहे. वाडा ते त्र्यंबकेश्वर हा वाडा-अक्कलकुवा बसने केलेला प्रवास माझ्यासाठी खास ठरला. या प्रवासात माझ्या ओळखीचे बस चालक आणि वाहक होते, ज्यामुळे हा प्रवास आणखीनच मजेदार आणि अविस्मरणीय झाला. चला, या प्रवासाचा सखोल अनुभव घेऊया.
त्र्यंबकेश्वर जाण्याच्या एक दिवस आधी प्रवासाची सगळी तयारी करून घेतली. वाडा-अक्कलकुवा ही बस वाड्यातून खानदेशमध्ये जाणारी पहिली गाडी. त्या बसचे चालक-वाहक तसे ओळखीचेच, मी नेहमी या मार्गाला काही न काही भेट देत असतो. यंदा या बसने प्रवास करण्याची तयारी करताना बसच्या वेळापत्रकाची माहिती घेतली. प्रवासात फोटो काढण्यासाठी कॅमेरा, म्युजिक ऐकण्यासाठी हेडफोन आणि काही फोटोसाठी आवश्यक असणारे वस्तू सोबत घेतले.
वाडा बसस्थानकावर पोहोचल्यावर तिथली धावपळ, प्रवाशांची गर्दी, आणि बसच्या होर्नचा आवाज ऐकून प्रवास करायची प्रेरणा अजून जागृत झाली. तिकीट खिडकीवर रांग लावून तिकीट घेताना अनेक प्रवाशांशी ओळख झाली. माझ्या ओळखीचे बस चालक आणि वाहक तिथे भेटले,त्यांच्या कामगिरीबद्दल विचारले तर ते अक्कलकुवा जात आहेत असे समजले. हे ऐकून प्रवासाच्या उत्साहात वाढ झाली. बसस्थानक समोरील “पंढरपुरी चहा” येथे आम्ही चहा घेतला व एक सेल्फी घेऊन प्रवासाला सुरुवात केली.
चालक आणि वाहक माझ्या ओळखीचे असल्यामुळे माझ्या स्वागतानेच प्रवासाची सुरुवात झाली. त्यांनी मला केबिनची सीट दिली. प्रवासादरम्यान त्यांच्या गप्पा आणि हसतमुख स्वभावाने हा प्रवास अधिकच आनंददायक बनला. सूर्यमाळ येथे जास्त प्रवासी चढले, आम्ही बस खाली उतरून तेथील निसर्गाचा आनंद घेतला.
पुढे या प्रवासात निसर्गाचे अद्भुत दृश्य अनुभवता आले. हिरवीगार शेतं, डोंगररांगा, घाटरस्ता आणि रस्त्याच्या कडेला वाहणारे लहान-मोठे झरे हे दृश्य मन मोहून टाकत होते. प्रवासात घेतलेल्या फोटोंमध्ये निसर्गाच्या विविध छटा कैद केल्या.
केबिनमध्ये बसलेल्या एका आजोबांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या कथा, अनुभव, मागे जाणाऱ्या झाडांची माहिती ऐकून आनंद झाला. एका प्रवाशाने त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल सांगितले, तर दुसऱ्याने त्याच्या गावातील सण-उत्सवांची माहिती दिली.
मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे १० मिनिटे बस थांबली आम्ही चहा-नाष्टा केला, काही प्रवासी चढले तर काही उतरले. खोडाळा गावानंतर घाटरस्त्यांचा अनुभव आव्हानात्मक होता. वळणांचे तीव्रपण, चढ-उतार, आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे सावधगिरीने प्रवास करावा लागला. पण चालकाच्या कौशल्यामुळे हा प्रवास सुरळीत पार पडला.
पावसाळ्यात हा प्रवास केल्यामुळे हवामानाची स्थिती बदलत होती. पावसामुळे रस्ते ओले होते आणि काही ठिकाणी धुके पसरले होते. त्यामुळे ड्रायव्हिंग अधिक काळजीपूर्वक करावी लागली. परंतु यामुळेच निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलून आले.
अंदाजे १०:३० वाजता आमची बस त्र्यंबकेश्वर बसस्थानकला पोहोचली. चालक,वाहक व बसला निरोप देत मी जव्हार रोड ला बसचे फोटो काढण्यासाठी आलो.
त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवाच्या बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे ठिकाण आध्यात्मिक वातावरणामुळे आणि सुंदर मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.
फोटोग्राफी करताना विविध angles चा वापर करून निसर्गाचे व बसचे सौंदर्य आणि प्रवासाचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद केले. लँडस्केप मोड, पॅनोरामिक व्यू, आणि क्लोज-अप शॉट्सचा वापर करून फोटोज् काढले..
तिथल्या हॉटेलमध्ये दुपारचे जेवण करून बसस्थानकात परत आलो, दुपारी १:३५ ची छ. संभाजीनगर (औरंगाबाद)-पालघर बस भेटली, तिच्यात नेहमीपेक्षा यंदा गर्दी कमीच होती, त्या बसचे चालक-वाहक सुद्धा ओळखीचे निघाले, मग पुन्हा केबिन सीट धरली आणि पुढचा प्रवास सुरु केला. बोलता-बोलता हरिहरगड, खोडाळा, परळी गाव पार करत सायंकाळी ४:२० वाजता आम्ही घरी वाड्यात पोहोचलो. चालक-वाहक काकांना निरोप देत घराकडे प्रस्थान केले.
ओळखीचे चालक-वाहक यांच्या सहवासामुळे हा प्रवास अधिकच रोमांचक आणि आनंददायक ठरला. प्रत्येक फोटोत आणि आठवणीत या प्रवासाचे सौंदर्य कैद आहे.
प्रवासाचा हा अनुभव जीवनातील विविध पैलूंची ओळख करून देतो. निसर्गाच्या कुशीत, सहप्रवाशांच्या सहवासात, आणि ओळखीच्या व्यक्तींनी भरलेल्या प्रवासाची मजा काही औरच असते.

Comments
Post a Comment