नवीन मानव विकास बस प्रवासाची अनोखी अनुभूती

 प्रत्येक प्रवास नवीन अनुभव, नवे चेहरे आणि मनात कोरल्या जाणाऱ्या आठवणी घेऊन येतो. परंतु जेव्हा प्रवास एसटीच्या नव्या ‘मानव विकास बीएस-६ बसने होतो, तेव्हा त्या आठवणी जरा खासच होतात. जालना ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) असा माझा हा पहिलाच प्रवास, पण तो कायमचा लक्षात राहील, कारण तो फक्त अंतर पार करण्याचा नव्हता – तो माणसांशी जोडणारा होता!


जालना आगारातून संध्याकाळी साधारण ५:३० वाजता माझा प्रवास परतूर-पुणे या बसने सुरू झाला. ही बस मंठा, जालना, छ. संभाजीनगर(औरंगाबाद),अहमदनगर मार्गे जाते. नवीन बीएस-६ मानव विकास निळीपरी बस समोर उभी होती – चमचमीत हेडलाईट्स, स्वच्छ आणि ताजी रचना, आणि आत बसताच जाणवणारा सुवास. ही निळीपरी काहीशी नवलाईची वाटत होती – जुन्या मानव विकास बसची ओळख नव्या रूपात भेटावी, तशी.


बसमध्ये प्रवेश करताच चालक आणि वाहकांचं सौम्य हास्य आणि आदरयुक्त बोलणं लक्ष वेधून घेत होतं. "नमस्कार, कुठपर्यंत?" असा स्नेही प्रश्न, आणि लगेच तिकीट, बसवण्याची मदत – एसटीचा सन्मान वाढवणारी ही माणसं होती.


बस प्रवाशांनी भरलेली होती – काही प्रवासी कॉलेजचे विद्यार्थी, काही कामासाठी जाणारे कर्मचारी, आणि काही माझ्यासारखे फक्त अनुभव घेण्यासाठी निघालेले. एकदा सीटवर स्थिर बसलो, की आजूबाजूला ओळखी होत गेल्या.


शेजारी बसलेले co-passenger रमेश पाटील सर, जालन्यातील मोठ्या कॉलेजचे शिक्षक, मला सांगत होते की जालना विभागात लालपरीच्या रूपातील बीएस-६ बस या महिन्यातच सुरु झाली असून, त्यांच्या प्रवासाचा अनुभव खूप चांगला आहे. पुढे काही क्षणांतच त्याच्या बोलण्यातून मैत्रीचा सूर उमटला. आजच्या युगात प्रवासातही अशी आपुलकी मिळणं दुर्मिळ आहे.


ही नवीन बीएस-६ बस म्हणजे एसटीचं आधुनिकतेकडे टाकलेलं मजबूत पाऊल. इंजिन शांत आणि प्रदूषणविरहित, मोबाईल चार्जिंगची सुविधा, आरामदायक सीट्स आणि स्वच्छता – सगळं काही उत्कृष्ट. रात्रीच्या गार वाऱ्यांत बसमध्ये बसून बाहेरची लाईट्स पाहण्याचा अनुभव म्हणजे निव्वळ जादू!


रस्त्यांवरच्या दिव्यांच्या रेषा, क्वचित समोरून येणाऱ्या ट्रकचे हेडलाईट्स, आणि बसच्या खिडकीतून दिसणारा चंद्र – या सगळ्यात एक वेगळीच शांतता होती. काही वेळाने सर्व प्रवासी शांत झोपले, पण मी आणि रमेश सर गप्पा मारत राहिलो – शिक्षण, प्रवास, आणि एसटीच्या जुन्या आठवणी.


सुमारे दोन तासानंतर छ. संभाजीनगरच्या (औरंगाबाद) आगारात पोहोचलो. तिथल्या दिव्यांच्या उजेडात बस थांबली आणि आम्ही सगळे आपापल्या वाटेवर निघालो. पण बसमधून उतरताना चालक आणि वाहकाशी "धन्यवाद" म्हणताना मनात खूप आदर वाटत होता – कारण त्यांनी फक्त प्रवास नाही, तर एक अनुभव दिला होता.


प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसतं – तो आपल्या आठवणींना, मैत्रींना, आणि मनाला जोडणारा पूल असतो. एसटीच्या बीएस-६ बसने केलेला हा प्रवास माझ्यासाठी खास होता – कारण तो शांततेने सुरू झाला, स्नेहाने भरला गेला, आणि आठवणी देऊन संपला.


तुम्हीही एकदा नक्की अनुभव घ्या – एसटीची नवीन रूपातली ही मानव विकास बस, आणि जालना ते संभाजीनगर प्रवास!

Comments