बस नाही, भावना होती: पुसद-मुंबई प्रवासाची गोष्ट
प्रत्येक प्रवास आपल्याला काही नवीन अनुभव आणि आठवणी देतो. यंदा माझा पुसद आगाराच्या पुसद-मुंबई या रातराणी बसने प्रवास करायचा होता. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ते भिवंडी असा लांब पल्ल्याचा हा प्रवास होता, आणि विशेष म्हणजे, हा प्रवास रात्रीच्या थंडगार वातावरणात होता.
रात्रीचे सुमारे १० वाजले होते, मी मध्यवर्ती बसस्थानकला पोहोचलो, स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहिली, “हे प्रवाशी नाशिक जाणारे तर नाहीत ना..?” असा विचार मनात निर्माण झाला थोड्या वेळात पुणे जाणारे बसेस फलाटावर लागण्यास सुरुवात झाली, तेव्हा समजलं की हे सर्व पुण्याला चालले आहेत,तेव्हा कुठे मनाला दिलासा मिळाला. माझी बस ११:३० ला येणार होती, पण कारणास्तव ती उशिरा म्हणजेच १२:०५ ला आली, गाडी तशी प्रवाशांनी भरलेली होती. स्थाकातील प्रवासी एकामागोमाग बसमध्ये चढत होते. मीही माझी बॅग बसच्या सीटवर ठेवली व सीट आरक्षित केले😂.
माझ्यासाठी या बसचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचा आवाज मनाला सुकून पोहोचवणारा, केबिनमध्ये बसून प्रवास आणि वेळेचे काटेकोर पालन (या वेळेस उशिरा आली). मी विंडो सीट घेतली, जिथून बाहेरचं सुंदर दृश्य अनुभवता येणार होतं.
चालकाने बस स्टार्ट केली आणि वाहकाने सिटी मारत बस मागे घेण्याचा इशारा दिला. बस मार्गस्थ होताना अजून २-३ प्रवाशी आमच्या बसकडे धावत आले. बसमध्ये जागा तर नव्हतीच, पण त्यांना थेट दादर ला उतरायचे होते, मग थोडी adjustment करून त्यांना बसमध्ये घेतले. आणि अशा तऱ्हेने आमची बस स्थानकाच्या बाहेर पडली.
बस निघाल्यावर छत्रपती संभाजीनगर(औरंगाबादचे) शांत रस्ते मागे पडू लागले. बाबा पेट्रोल पंप,अहमदनगर नाका नंतर दौलताबाद टी-पॉईंट असे थांबे पार केले. बाहेर चांदण्यांनी सजलेलं आकाश, आणि आसपासचा निवांतपणा मनात आनंद निर्माण करत होता. बस हळूहळू वेग घेत होती, आणि प्रवासाच्या रोमांचक वाटचालीला सुरुवात झाली.
सुमारे रात्री १:३० च्या सुमारास बस वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील धाब्यावर थांबली. “गाडी १५ मिनिटं थांबेल” असे बोलून चालक आणि वाहक चहा पिण्यासाठी गेले.मीही माझी बॅग सीटवर ठेवून खाली उतरलो. थंडी जरा जास्तच होती म्हणून जेवढं लवकर होईल तेवढं चहाचा कप आणि बसचा एक फोटो काढला आणि परत बसमध्ये आपल्या सीटवर जाऊन बसलो.थोड्यावेळात बस सुरू झाली, वाहकाने प्रवाशी मोजले व “डबल बेल” मारली. गाडीने आता चांगलाच वेग धरला होता. रस्ता तसा खराबच होता, गाडीला आणि प्रवाशांना त्रास होणार नाही याची बाब लक्षात घेऊन चालकाने बसच्या वेगावर नियंत्रण ठेवत बस वैजापूर शहरात पोहोचवली. रात्रीच्या वेळी तिथे प्रवासी नसतात, म्हणून नेहमीप्रमाणे बस स्थानकावर न जाता बाहेरून नेली.
रात्री सुमारे २:१५ वाजता येवला बसस्थाकात प्रवेश केला.तिथेच फक्त काही प्रवाशी बसमध्ये चढले तेही आरक्षित होते. मग सलग आमची बस नाशिक पर्यंत चालली. जसजसं नाशिक जवळ येत होतं, तसतसं चालक-वाहक यांच्या चेहऱ्यावर झोप दिसत होती. बस औरंगाबाद नाका येथे थांबली, थोडेसे प्रवासी उतरले आणि बस हलकीशी रिकामी झाली. ४:१० वाजता नाशिक नवीन मध्यवर्ती येथे पोहोचली. आणि बस मध्ये फक्त ७ प्रवाशी राहिले. मीही मागची सीट सोडून पुढे केबिनमध्ये बसलो. मागे थंडी खूप लागत होती, केबिनमध्ये इंजिनमुळे थंडी थोडी कमी या आशेने बसलो. हा मार्ग ३ आगार चालवतो-पुसद, जालना आणि नाशिक. जालना आगारच्या चालक-वाहकाची ड्युटी आता संपली. नाशिक आगारचे कर्मचारी येईपर्यंत त्यांनी बस सोडली नाही. आता नाशिक आगाराचे अनुभवी चालक-वाहक यांनी बसची जबाबदारी घेतली. आणि जालना आगारच्या कर्मचाऱ्याने बसला निरोप देत तेथून निघून गेले.
नाशिकच्या चालकाने बसचे टायर,स्टेरिंग,लाईट चेक केले, समोरील काच आणि आरसे पुसले तसेच वाहकाने तिकिटे तपासून शांत बसून घेतले. बस नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात येऊन थांबली. बस्थानाकातून एकही प्रवासी आमच्या बसमध्ये चढला नाही, कारण आमच्या आधीच एक ठाणे आगारची बस गेली होती. काउंटरला बसची एन्ट्री करून आम्हीही तिथून निघालो. मनात एक वेगळाच आनंद होता,जणू डोळ्यासमोर कसारा घाटच आहे. आमच्या पुढेच असलेल्या ठाणे आगारच्या बसचा मार्ग पाहण्याचा खूप प्रयत्न केला,पण बसच्या वेगामुळे आणि धुक्यामुळे बसचा मार्ग पाहता आला नाही.
बसचा वेग आता ८० किमी/तासाच्या पुढे गेला होता, पण त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य यामुळे प्रवास अगदी सुरक्षित वाटत होता.
जसे वेळ वाढत जात होते तसे थंडीही वाढत होती, केबिनमधल्या इंजिनमुळे थंडी एवढी जाणवली आणि.
बाहेर रस्त्यांच्या कडेला दिसणारे झाडे धुक्यात हरवलेली वाटत होती. खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्याने मनाला गारवा दिला. अर्धी थंडी आणि इंजिनच्या गर्मीमुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित झाला होता.
इगतपुरी, घोटी पार करत आता आमच्या बसने नाशिक जिल्हा सोडला. पहाटे ५:०५ च्या सुमारास बस ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातलं खर्डी गावच्या एका प्रसिद्ध हॉटेलवर थांबली.
हे हॉटेल हायवे फेमस म्हणून ओळखले जाते, आणि इथे नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. चहा आणि स्नॅक्स घेतले आणि प्रवासातील थकवा क्षणात नाहीसा झाला. इथेही चहाच्या कप आणि बसचा फोटो काढला, गरमागरम चहा हातात घेताच थंडगार हवामानाला तोडीस तोड ऊर्जा मिळाली. हॉटेलवरून निघाल्यानंतर बस शहापूर, वासिंद,पडघा मार्गे भिवंडीच्या दिशेने धावू लागली. नाशिक-मुंबई महामार्ग शांतच होता, पण एका बाजूला डोंगररांगांचे अस्पष्ट रूप दिसत होते. या भागातील थंडगार हवा आणि बसचा वेग यामुळे प्रवास अधिकच खास बनला.
सकाळी ७:५० वाजता बस भिवंडी येथे पोहोचली. शहरात प्रवेश करताना आपण आपल्या हद्दीत आलो याचा आनंद होत होता आणि ज्या बसने आपल्याला एवढ्या लांबून सुरक्षित आणले ती बस सोडावी लागेल याचा दुःखही झाला, पण काहीही असो, त्या प्रवासाच्या आठवणी मनात घर करून राहिल्या. भिवंडी बसस्थानकात पोहोचलो, दररोजप्रमाणे ठाणे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होतीच.मी बसमधून उतरलो.बसची निघण्याची वाट बघत उभा राहिलो, “मला त्या बससोबत एवढा लगाव का आहे,हे मलाही कळले नाही”. बसची निघण्याची वेळ झाली, मी कॅमेरा चालू केला आणि प्रवासाच्या सोबतीचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. आणि अश्या तऱ्हेने बस आपल्या पुढच्या मार्गासाठी निघाली.
स्थानकाच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच जेथे जव्हार,वाडा,बोईसर,पालघर बसेस लागतात त्या फलाटावर येऊन उभा राहिलो. वाडा जाणाऱ्यांची गर्दी तशी होतीच. माझा लक्ष पार्किंगमध्ये उभी असलेली गुजरात परिवहनची भिवंडी-सुरत या
बसकडे होते. तेवढ्यातच वाडा आगारची बस आली, त्या बसला मार्गफलक नव्हता, म्हणून प्रवाश्यांनी त्या बसकडे दुर्लक्ष केले. पण मला माहिती होतं की बस वाड्यालाच जाणार, आधीच व्हाट्सएपवर आमचं बोलणं झालं होतं. बसमध्ये चढताच मार्गफलक माझ्या हाताने लावला तेव्हा प्रवाशी बसकडे धावत आले 😂.
...आणि अनगाव, अंबाडी, कुडूस असे लोकल थांबे घेत अखेर होम टाऊन वाड्याला पोहोचलो..!
हा प्रवास माझ्यासाठी केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा नव्हता. तो एका अद्भुत अनुभवाचा साक्षीदार होता. थंडीचं वातावरण,बसचा वेग,रस्त्यातले खड्डे😂, चालक-वाहकांचा कौशल्यपूर्ण वावर, आणि रस्त्यांवरील निसर्गरम्य दृश्यं यामुळे हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील, अशी आठवण बनली.

Comments
Post a Comment