चार दिवसांचा अविस्मरणीय एसटी प्रवास: कोकण-मराठवाडा-विदर्भ सफर
प्रवास हा एक अनुभव असतो, नव्या माणसांना भेटण्याचा, वेगवेगळ्या ठिकाणांचा आणि संस्कृतींचा आस्वाद घेण्याचा. एसटीच्या 'आवडेल तेथे प्रवास' या ४ दिवसांच्या पासचा उपयोग करून मी कोकण, मराठवाडा आणि विदर्भाचा प्रवास केला. हा प्रवास केवळ स्थळांचा नव्हता, तर एक आठवणींनी भरलेला आनंदी अनुभव होता.
पहिला दिवस: २६ जानेवारी २०२५ :-
प्रवासाला सुरुवात दुपारी झाली. माझ्या गावाहून वाडा बसस्थानक गाठले आणि पहिली बस पकडली ती वाडा ते भिवंडी. भिवंडी पोहोचल्यानंतर मला पुढे विदर्भाकडे जायचे होते, म्हणून मी रात्रीची एकुलती एक विदर्भाला जाणारी मुंबई-पुसद ही एसटी बस निवडली. ती भिवंडी बसस्थानकला तिच्या वेळेवर म्हणजे सायंकाळी ५:२० वाजता आली.
बस येताच मी चालका भाऊला सांगितले “आपल्या या पुसद बसला मार्गफलक भेट द्यायचा आहे..” चालक भाऊने बसची एन्ट्री केली, आणि मार्गफलक स्वीकारला. त्यांना मार्गफलक भेटला आणि मला दोन नवीन प्रवासातले साथीदार. केबिनमध्ये कोणी बसलेला दिसला नाही म्हणून त्या सीटवर जाऊन बसलो. अशा तऱ्हेने माझा प्रवास सुरु झाला.
चालक भाऊसोबत बोलता बोलता कधी शहापूर आला कळलेच नाही. तिथे थोडावेळ थांबून, पुढे हायवेवर असलेल्या “हॉटेल दुर्गा”वर जेवणासाठी थांबलो. हॉटेलवर त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेतला, जेवणानंतर चहा घेत पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. हॉटेल सोडल्यावर आमची गाडी एकही थांबा न घेता नाशिक पोहोचली. तिथे चालक आणि वाहक यांची ड्युटी संपली. त्यांनी जालना आगारच्या स्टाफकडे बस सुपूर्द केली. नवीन बोर्ड मी दिला असे चालक भाऊने त्या स्टाफला सांगितले, मला खाली बोलावून विचारले, “हे तू बोर्ड दिले त्याचे तुला काही पैसे द्यावे लागतील का..?” मीही हसत म्हणालो “मी एसटीप्रेमी आहे, नेहमी काही न काही बसला भेटवस्तू देत राहतो, यंदा या बसला भेट दिली...”! ' तू हे जे काही करतोयस, खूप चांगला काम आहे ' असे जालना आगारचे वाहक मला बोलले. थोडावेळ थांबून नाशिकच्या त्या चालक-वाहक काकाला निरोप देत, बदली झालेले स्टाफ आणि मी पुढच्या प्रवासाला निघालो.
नाशिक ते छ. संभाजीनगर (औरंगाबाद) नेहमीचा प्रवास आहे आणि मला पुढे जागून प्रवास करायचा होता, म्हणून मागे जाऊन निवांत झोप घेतली.
औरंगाबाद आल्यावर फ्रेश होऊन आम्ही पुन्हा चहा घेतला, प्रवाशांचे आरक्षण होते म्हणून थोडा थांबावा लागला. बुकिंग करून प्रवास सुरु झाला.
जालनाला परत चालक वाहक बदलले. आता पुसद आगारच्या स्टाफने बस ताब्यात घेतली. जालना नंतर मंठा,औंढा,हिंगोली,कळमनुरी, शेंबाळ पिंपरी असे थांबे घेत सकाळी ८:५५ वाजता पुसद गाठले. प्रवासात वेगवेगळ्या प्रवाशांशी संवाद साधता आला. एसटीच्या प्रवासाची एक गंमत म्हणजे तुमच्याबरोबर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक असतात, ज्यांच्याशी गप्पा मारताना वेळ कसा जातो ते कळतही नाही !
दुसरा दिवस: २७ जानेवारी २०२५ :-
सकाळी मी पुसदवरून १० वाजताची नांदेड-नागपूर या बसमध्ये बसलो आणि विदर्भाची सफर सुरू केली. पुसद हुन पुढे दिग्रस जवळच्या एका धाब्यावर गाडी थांबली. तिथे नागपूर स्पेशल तर्री पोहाचा नाश्ता केला. मग दिग्रस, दारव्हा, यवतमाळ,कळंब आणि वर्धा असे थांबे नागपूर पोहोचलो. ह्या गावांची नावे फक्त कमी दिसतात, नागपूर जायला तब्बल सहा तास लागले, त्यात रस्ता पण खराब होता. सायंकाळी ४:२० ला “ऑरेंज सिटी” मध्ये प्रवेश केला .नागपूरमध्ये पोहोचताच माझी पहिली भेट होती ताजुद्दीन बाबांच्या प्रसिद्ध दर्ग्यावर. Friend ला कॉल केला, मग स्कूटीवर आम्ही तिथे गेलो, फॅमिलींसाठी ऑरेंज बर्फी घेतली, तिथे काही वेळ शांततेत घालवल्यानंतर मी परतीच्या प्रवासासाठी ७ वाजता गणेशपेठ बसस्थानक गाठले. ७:१५ संभाजीनगर (औरंगाबाद) बस आली नव्हती, टाईमपास साठी बसस्थानकाबाहेर मोबाईल शॉपमध्ये जाऊन मोबाईलला ग्लास बसवला, काही बसेसचे फोटो घेतले आणि ७:३५ ला बस फलाटावर लागली. बस ७:४५ वाजता निघाली. रात्री माझा पुढचा प्रवास होता नागपूर-संभाजीनगर (औरंगाबाद) या बसने. प्रवास दीर्घ होता, पण एसटीच्या मोठ्या खिडक्यांमधून रात्रीच्या प्रवासाचा अनुभव काही औरच होता. कोंढाळी, कारंजा घाडगे, अमरावती, कारंजा लाड, मूर्तिजापूर, अकोला, खामगाव, चिखली, जालना असे थांबे घेत अखेर औरंगाबाद ला सकाळी ७:५० वाजता पोहोचलो.
तिसरा दिवस: २८/२९ जानेवारी २०२५ :-
सकाळी ७:५० वाजता मी औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक गाठले आणि तिथे माझ्या बहिणीकडे थांबलो. मुघल सम्राट औरंगजेब आलमगीर यांच्या दर्गावर गेलो आणि संध्याकाळी पुन्हा प्रवासाला निघायला सज्ज झालो.रात्री ८:१५ वाजता संभाजीनगर (औरंगाबाद)-मुंबई सेंट्रल ही हिरकणी बस पकडली आणि नाशिककडे प्रवास सुरू झाला. रात्री १२:३० वाजता नाशिक ला पोहोचलो. २९ च्या सकाळी ऑफिसला जायचे होते म्हणून प्रवासात थोडा बदल केला. नाशिक हुन पहाटे ३ ची पुसद-मुंबई बसने प्रवास न करता यंदा १:४० वाजता येणार शहादा-मुंबई या प्रवास करायचा ठरवला. ती बस वेळेवर आली पण तिच्यात खूप गर्दी असल्याने ती बस सोडावी लागली.शांत बसून वाट पाहायला लागलो पुसद-मुंबई बसची. एका जागेवर बसून कंटाळा येत होता म्हणून बसस्थानक परिसरात थोडी फेरी मारली. ३, ३:३०, ४ वाजले अजूनही मुंबई बस आली नाही.मग त्या बसने प्रवास करायची आशाच सोडून दिली.
चौथा दिवस: २९ जानेवारी २०२५ :-
शेवटी जव्हार मार्गे जायचा निर्णय घेतला. कंट्रोल केबिनला चौकशी केली असता, ५ वाजता सेलवास बस आहे असे ते बोलले. ५ ची बस ५:१० ला आली तीही शिवशाही आणि तेवढ्यातच पुसद-मुंबई बस पण आली. सकाळी लवकर कामावर जायचं असल्यामुळे त्या बसने गेल्यावर खूप उशीर होईल आणि भिवंडी-वाडा रस्ताही तसा खराब आहे,मग नाशिक-सेलवास या शिवशाही बसने जव्हार पर्यंत प्रवास करायचे ठरवले. शिवशाहीचा आरामदायक प्रवास अनुभवायला मिळाला. त्या बसने मला अवघ्या ३ तासात जव्हार बसस्थानकला सोडले.
आता शेवटचा प्रवासाचा टप्पा होता जव्हार ते वाडा. हे अंतर मी जव्हार-पंढरपूर या बसने पार केले आणि अश्याप्रकारे ४ दिवसांच्या या अद्भुत सफरीचा शेवट झाला.
या चार दिवसांच्या प्रवासात मी विविध ठिकाणी भटकंती केली, नव्या मित्रांना भेटलो आणि एसटीच्या प्रवासातील सुख-दुःख अनुभवले. महाराष्ट्राच्या तीन वेगवेगळ्या विभागांना जोडणारा हा प्रवास खरोखर संस्मरणीय होता.
एसटी प्रवास म्हणजे वेगळ्या अनुभवांची खाण – गावी जाणारे, शहरात काम करणारे, विद्यार्थी, प्रवासी असे अनेक लोक भेटतात.
वेगवेगळ्या भागातील संस्कृती आणि भाषा समजते – कोकण, मराठवाडा आणि विदर्भ यांच्या बोली, लोकजीवन आणि खाद्यसंस्कृती यांच्याशी जवळून परिचय झाला.
स्वत:सोबत वेळ घालवण्याची संधी – लांबचा प्रवास असला तरी शांतपणे बसून विचार करायला वेळ मिळतो.
हा प्रवास केवळ गंतव्यस्थानं गाठण्याचा नव्हता, तर तो एका सुंदर आठवणींच्या पानावर कोरला गेला. 'आवडेल तेथे प्रवास' पास खरोखरच प्रवासप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे.
पुढच्या प्रवासासाठी सज्ज!
▪️एसटीची कधीही न थांबणारी दोन चाके- https://buskaashik.blogspot.com/2025/04/blog-post.html
▪️ठाणे जिल्ह्यातील वाडा बसस्थानकाचे वेळापत्रक पहा- https://buskaashik.blogspot.com/2025/05/mobile-friendly-layout-body-background_50.html
▪️एसटीच्या प्रवासात आतापर्यंत बनलेल्या मैत्री- https://buskaashik.blogspot.com/2025/05/blog-post_4.html
▪️ एसटीच्या प्रवासातील अनपेक्षित अनुभव- https://buskaashik.blogspot.com/2025/05/blog-post_2.html
▪️ एसटीची जुनी तिकिटं आणि काही आठवणी- https://buskaashik.blogspot.com/2025/05/blog-post_3.html


Comments
Post a Comment