मुंबई-शहादा रातराणी बस
मुंबईहून उत्तर महाराष्ट्रातील शहादा या ठिकाणी जाण्यासाठी एसटी महामंडळाने रातराणी बस सेवा उपलब्ध केली आहे. मुंबई - शहादा रातराणी बस ही प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आरामदायक सेवा आहे. या बसमधून प्रवास करताना रात्रभर आराम करता येतो.
● या बस-प्रवासाची काही वैशिष्ट्ये:
✔️ बीएस-६ मानांकन असलेली आयशर चेसिस बस
✔️ अनुभवी चालक आणि वाहक
✔️पुश-बॅक सीट्स, मोबाईल चार्जिंगची सुविधा
✔️ ऑनलाइन आरक्षणाची सुविधा
✔️ भिवंडी, शहापूर, नाशिक, मालेगाव, धुळे, दोंडाईचा मार्गे प्रवास
✔️ खर्डी नजीक हॉटेल हायवे फेमस येथे जेवणासाठी थांबा
✔️ प्रौढांसाठी मुंबई - शहादा तिकीट दर: ₹७४०
✔️ महिला सन्मान योजनेअंतर्गत तिकीट दर: ₹३७३
या बसचा प्रवास मुंबईच्या सेंट्रल बसस्थानकातून रात्री ८ वाजता सुरू होतो. मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यांवरून बसदादर, कुर्ला, ठाणे, या ठिकाणी थांबे घेत हळूहळू पुढे जाते. या बसमध्ये बसल्यानंतर रात्रीच्या प्रवासाचा एक वेगळाच आनंद मिळतो. प्रवासास सुरुवात होताच अनेक प्रवासी आपापल्या जागेवर स्थिर होतात आणि प्रवासाचा अनुभव घेऊ लागतात. सुमारे अडीच तासाच्या प्रवासानंतर बस रात्री १०:३० च्या सुमारास भिवंडी बस स्थानकात पोहोचते. येथे काही प्रवासी उतरतात तर काही प्रवासी शहादाकडे जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश करतात.
भिवंडीहून निघाल्यानंतर बस शहापूरमार्गे नाशिककडे कसारा घाट मार्गे जाते. हा भाग डोंगराळ असल्यामुळे रस्त्यात काही वळणे आणि घाटाचे रस्ते येतात. रात्रीच्या वेळेस वाहतूक ही तुलनेने कमी असल्यामुळे बस सहज आणि वेगात पुढे सरकत राहते.
या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एसटी महामंडळाने जेवणासाठी बसला थांबण्याची उत्तम सोय केली आहे. खर्डी नजीकच्या हॉटेल 'हायवे फेमस' येथे ही बस थांबते. हे हॉटेल ट्रक आणि एसटी प्रवाशांसाठी प्रसिद्ध असून येथे गरमागरम जेवणाची उत्तम सुविधा उपलब्ध आहे.
येथे तुम्ही वडापाव, मिसळ, पोळी-भाजी, भाकरी, चहा आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. चालक आणि वाहकही येथे जेवण करतात आणि काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर प्रवास पुन्हा सुरू करतात.
भिवंडी ते नाशिकचा प्रवास सुमारे ४ तासांचा आहे. रात्री १:३० च्या सुमारास नाशिक एसटी स्थानकावर पोहोचते. नाशिक हे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथे काही प्रवासी उतरतात आणि काही नवीन प्रवासी बसमध्ये चढतात. रात्रीच्या वेळी नाशिकचे बसस्थानक प्रकाशमान असते आणि इथे रात्रीच्या वेळीसुद्धा सतत गाड्यांची ये-जा सुरूच असते.
नाशिकहून सुटल्यानंतर बस मालेगाव, धुळे, दोंडाईचा या महत्त्वाच्या शहरांवर थांबत पुढे जाते. पहाटेच्या वेळी रस्ते बऱ्याच प्रमाणात मोकळे असतात आणि गार वारा जाणवतो.
पहाटे ७-७:१५ वाजता शहादा येथे पोहोचल्यावर गावातील वातावरण अगदी प्रसन्न वाटते. सकाळच्या वेळी बस स्थानकावर चहाच्या टपऱ्यांवर गर्दी दिसते आणि गाव हळूहळू जागे होत असते.
● बसविषयी थोडी माहिती-
• बीएस-६ मानांकन असलेली आयशर चेसिस बस- ही बस बीएस-६ मानांकन असलेली असून नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे प्रवास अधिक गुळगुळीत आणि प्रदूषणविरहित होतो. इंजिनचा आवाज कमी असल्याने प्रवास अधिक आरामदायक वाटतो.
• अनुभवी चालक आणि वाहक- रात्रीचा प्रवास असला तरी चालक आणि वाहक प्रवाशांची योग्य काळजी घेतात. सुरक्षित आणि वेळेवर पोहोचण्याची जबाबदारी ते चोख पार पाडतात.
• ऑनलाइन आरक्षणाची सुविधा- एसटी महामंडळाच्या ऑनलाइन बुकिंग सुविधेमुळे तुम्ही घरी बसूनही तिकीट आरक्षित करू शकता. हे तिकीट महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे बुक करता येते.
• महिला सन्मान योजनेमुळे महिलांना ५०% सवलतीत तिकीट उपलब्ध होते. त्यामुळे महिलांसाठी ही बस सेवा अधिक किफायतशीर ठरते.
मुंबई-शहादा ही रातराणी बस प्रवासाचा वेळ वाचवणारी उत्तम सेवा आहे. रात्री प्रवास केल्याने दिवसा वेळ वाया जात नाही आणि सकाळी आपण आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतो.
● या बसने प्रवास का करावा..?
✔️ आरामदायक आणि सुरक्षित प्रवास
✔️ डोंगराळ भागातून जाणारा नयनरम्य मार्ग
✔️ सुव्यवस्थित थांबे आणि जेवणाची व्यवस्था
✔️ ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि सवलती
तुम्हीही एकदा मुंबई - शहादा रातराणी बसचा प्रवास करून हा अनुभव घ्या !

Comments
Post a Comment